यवतमाळ- जिल्ह्यात आज 3 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. यात महागाव तालुक्यातील मुडाना येथील युवक (वय 30 वर्ष), पुसद येथील पुरूष (वय 60 वर्ष) आणि नेर तालुक्यातील पाथ्रडगोळे येथील महिलेचा (वय 75 वर्ष) समावेश आहे.
आज या तिघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 27 वर गेली होती. मात्र वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षामध्ये भरती असलेले व सुरवातीला पॉझिटिव्ह आलेले 2 जण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे सध्यास्थितीत जिल्ह्यात 25 अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण भरती आहेत.
सध्यास्थितीत विलगीकरण कक्षामध्ये 32 जण भरती असून यापैकी 25 अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह आहेत. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 171 वर गेली असून यापैकी 143 जण बरे होवून घरी गेले आहेत.
तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या जिल्ह्यात 3 आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत एकूण 2 हजार 646 नमूने तपासणीसाठी पाठविले. यापैकी 2 हजार 644 प्राप्त तर 2 अहवाल अप्राप्त आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 473 जण निगेटिव्ह आले आहे.