यवतमाळ - नेर तालुक्यातील झोंबाडी (बाळेगाव) येथे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या पथकाने गोपनीय माहितीवरून धाड टाकून इनोव्हा गाडीतून गांजा तस्करी करणाऱ्या महिलेसह चार जणांना अटक केली आहे. दरम्यान, पाचवा एक आरोपी पसार होण्यात यशस्वी झाला. यावेळी ३१ लाखांचा एकूण ऐवज जप्त करण्यात आला. नेर तालुक्यात गांजा तस्करीवर कारवाई झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती.
तब्बल २ क्विंटल गांजा पोलिसांनी केला जप्त -
जिल्ह्यात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मोठी कारवाई केली आहे. नेर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात गांजा तस्करी होत होती. मात्र, हा गांजा कुठून येतो याचा शोध स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिसांना लागत नव्हता. गुरूवारी खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सुलतानपूर येथील कुख्यात गांजातस्कर महिला गांजा देण्यासाठी झोंबाळीडा येत असल्याचे कळाले. यावरून एलसीबी पथकाचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी व सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक देशमूख यांनी पथकासह सापळा रचून इनोवा (एमएच १२ एनबी ११४७) ही गाडी पकडली. यावेळी गांजातस्कर महिलाही या सापळ्यात अडकली. यावेळी पथकाने इनोवा गाडी व घराची झडती घेतली असता तब्बल १ क्विंटल ९० किलो १२ पोत्यांतील गांजा जप्त केला. याची किमंत २२ लाख ५० हजार रुपये असल्याची माहिती पथकातील अधिकाऱ्यांनी दिली. तर इनोवा गाडी ९ लाख रूपये असा ३१ लाख ५० हजाराचा ऐवज गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतला.
चौघांना अटक एक फरार -
या प्रकरणात एका महिलेसह याशीन अली मूजफ्फर अली (४० रा. झोंबाडी), मो.साहील मो. अकील (२८, रा. ताजनगर यवतमाळ), फईम करीम शेख (२६, कुंभारपुरा, यवतमाळ) या चौघांना पोलीसांनी अटक केली. तर घटनास्थळावरून खलीद शेख उर्फ गुड्डू लुकमान शेख (२२, अमननगर, यवतमाळ) हा पसार झाला. या कारवाईत पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक देशमूख, गजानन करेवार, अमोल पुरी, जमादार गजानन डोंगरे, सलमान शेख, अर्पिता चौधरी, वंदना निचडे यांच्यासह आदींचा समावेश होता. याप्रकरणी आरोपींवर अमली पदार्थ कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा - बैलगाडी शर्यत तर होणारच, आमदार गोपीचंद पडळकर यांचा एल्गार