पुणे : शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांच्या पक्षाकडून बारामतीत घरोघरी जात जोरदार प्रचार सुरू आहे. अशातच काल (17 नोव्हेंबर) शरद पवार यांची पत्नी प्रतिभा पवार व त्यांची नात रेवती सुळे यांना बारामती टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखण्यात आलं होतं. तब्बल अर्धा तास त्यांना गेटवर थांबवून ठेवण्यात आलं. याबाबत आता बारामती टेक्स्टाईल पार्कच्या वतीनं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
गेटवर असलेला सिक्युरिटी परप्रांतीय : "ज्या गेटमधून प्रतिभा पवार आतमध्ये जाण्यासाठी आल्या, त्या गेटमधून मालवाहतूक केली जाते. त्यामुळं तिथून त्यांना सोडण्यात आलं नव्हतं. टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यासाठी दुसरा गेट आहे. प्रतिभा पवार ज्या गेटमधून आल्या त्या गेटवर असलेला सिक्युरिटी हा परप्रांतीय आहे. तो त्यांना ओळखत नव्हता. मला जेव्हा कळलं, तेव्हा मी लगेच सूचना दिल्या आणि प्रतिभा पवार यांना आतमध्ये सोडण्यात आलं. आम्हाला जर याची कल्पना असती, तर आम्ही त्यांच्या स्वागतासाठी उभे राहिलो असतो," असं स्पष्टीकरण टेक्स्टाईल पार्कचे व्यवस्थापक अनिल वाघ यांनी दिलं.
बारामतीत काका विरुद्ध पुतणे : राज्याचं नव्हं तर देशाचं लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा निवडणुकीत काका विरुद्ध पुतणे अशी लढत होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एकीकडे, अजित पवार तर दुसरीकडे शरद पवार यांच्या पक्षानं युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिल्यानं बारामतीत काका विरुद्ध पुतणे अशी लढत होत आहे. दोन्ही पवारांकडून बारामती विधानसभा मतदार संघात प्रचार करत सभा घेत आपली भूमिका मांडण्यात येत आहे. अश्यातच आज बारामती विधानसभा मतदारसंघात दोन्ही पवारांकडून शेवटची सभा घेण्यात येणार आहे. दोन्ही पवार आज काय भूमिका मांडतात याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा