यवतमाळ - लॉकडाऊन काळात मजूर वर्गाचा पोटाचा प्रश्न गंभीर बनला आहे. एका माणसाने पोटासाठी भाकरीची चोरी केली. यवतमाळ शहरातील गांधी चौकात ही घटना मंगळवारी रात्री मोर झुणका भाकर केंद्रात घडली. सराफा लाईनला लागून असलेल्या या ठिकाणी रात्रभर चौकीदार व पोलिसांची गस्त असते. त्यानंतरही हा प्रकार घडल्याने व्यापारी वर्गात दहशत निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे जेवण झाल्यावर चोर मस्त दोन तास दुकानाबाहेर झोपला.
गांधी चौकात मोर यांचे झुणका-भाकर केंद्र आहे. लॉकडाऊनच्या काळात मोर कुटुंबीयांनी अनेक गरजूंना व रस्त्यावरील निराधारांना मोफत झुणका-भाकर वितरण केली आहे. पैसे असले नसले, तरी परिस्थिती पाहून गरीब व्यक्तीला ते झुणका-भाकरीसाठी नाही म्हणत नाहीत. त्यामुळे हे झुणका-भाकर केंद्र शहरात सर्वत्र प्रसिद्ध आहे.
मंगळवारी रात्री एक चोरटा या झुणका भाकर केंद्रासमोर आला. त्यांने झुणका-भाकर केंद्रांचे लाकडी दार हाताने ओढून तोडले व आत प्रवेश केला. त्याने रोख रक्कम शोधण्याऐवजी सर्वप्रथम तेथील स्वयंपाक घरात जाऊन खायला काही आहे, का याचा शोध घेतला. शेव भाजी, झुनका भाकरवर ताव मारून त्याने पोटाचा दाह शांत केला. त्यानंतर त्यांने दुकानातील गल्ला उचलला. त्यातील 250 रुपयांची रोख खिशात टाकून दुकानाबाहेर झोपी गेला. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.