यवतमाळ - मुलगी झाल्याने तिला ठार मारल्याचा संशय व्यक्त करण्यात आल्याने मुलीचा पुरलेला मृतदेह महसूल व पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बाहेर काढण्यात आला. त्यानंतर शवविच्छेदन करण्यासाठी यवतमाळ जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती घाटंजी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश शुल्का यांनी सांगितले. हा प्रकार घाटंजी तालुक्यातील करमना गावामध्ये घडला.
करमना गावातील अशोक श्यामराव शिंदे यांना २८ जूनला मुलगी झाली. त्याआधी त्यांना सहा मुलीच झाल्या होत्या. १५ जुलैला त्यांच्या सातव्या मुलीचा मृत्यू झाला. तिचा दफनविधीही पार पडला. दरम्यान, घाटंजीचे ठाणेदार दिनेश शुक्ला यांना निनावी फोन आला. करमना गावातील बालिकेचा मृत्यू नैसर्गिक नाही. तिला नख लावून ठार मारण्यात आले आहे, अशी माहिती फोन केलेल्या व्यक्तीने दिली. ही माहिती ऐकताच ठाणेदार शुक्ला यांनी प्राथमिक माहिती काढून मृत्यू झाल्याची खातरजमा केली. त्यानंतर उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडून मृतदेह उकरण्यासाठी परवानगी घेतली.
ठाणेदार शुक्ला व नायब तहसीलदार राठोड घटनास्थळी पोहोचले. त्यांच्या उपस्थितीत १८ दिवसांच्या बालिकेचा मृतदेह जमिनीतून बाहेर काढण्यात आला. हा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवण्यात आला. अद्याप तरी शवविच्छेदन झालेले नाही. शवचिकित्सा अहवालानंतर या प्रकरणातील सत्य बाहेर येईल, असे पोलिसांनी सांगितले. यातील मृत बालिकेचे वडील रोजगाराच्या शोधात छत्तीसगडला गेल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले.