यवतमाळ - जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. या मुसळधार पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे अनेक गावांना पुराचा फटका बसला आहे. दरम्यान, पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामधून बऱ्याच नागरिकांन ये-जा करावी लागत आहे. ये-जा करू नका असे असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, आपली बैलगाडी घेऊन जात असणारा शेतकरी या पाण्याच्या वेगामुळे बैल आणि बैलगाडीसह वाहून गेल्याची घटना घडली आहे. ही घटना जिल्ह्यातील लिंगी सायखेडा येथे घडली आहे.
लिंगी सायखेडा येथील नदीला पूर आला होता. दरम्यान, फुलवाडी येथील एका शेतकऱ्याने आपल्या बैलगाडीसह पुल पार करण्याचे धाडस केले. हा शेतकरी मद्यप्राशन अवस्थेत असल्याचे समजते. प्रत्यक्षदर्शींनी शेतकऱ्यास पुलावरून बैलगाडी घेऊन जाऊ नये असे सांगितले. मात्र, त्याने ते न एकता पुलावरून बैलगाडी घातली. त्यामध्ये तो बैलगाडीसह वाहून गेला. फुलवाडीवरून सायखेडा मार्गे डोळंब्याकडे शेतकरी जात होता. शेतकरी वाहून गेल्याचे पाहून प्रत्यक्षदर्शींनी तत्काळ नदीत उड्या मारून शेतकऱ्याचे प्राण वाचवले. मानवी साखळी तयार करत शेतकऱ्याला नदीतून बाहेर काढण्यात यश आले. मात्र, या घटनेत दोनही बैल मरण पावले आहेत.