यवतमाळ - शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागला असून कृषि सामग्री खरेदी करण्यासाठी त्याची लगबग सुरू आहे. जिल्ह्यात उत्कृष्ट प्रतिचे बियाणे, खते, किटकनाशक आदींचा पुरवठा शेतकऱ्यांना होणे गरजेचे आहे. जिल्ह्यात चोरट्या मार्गाने बोगस बियाणे येत असल्यास त्याच्या वाहतूकीवर तसेच पुरवठ्यावर आळा घालून संबंधितांवर कडक कारवाई करा, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी कृषि विभागाला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते.
खरीपावरच संपूर्ण वर्षभराचा डोलारा
खरीप हंगाम हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा अतिशय महत्वाचा आहे. या हंगामाच्या भरोशावरच त्याचा संपूर्ण वर्षभराचा डोलारा अवलंबून असतो. त्यामुळे शेतकऱ्याला उच्च प्रतिचे बियाणे, खते आदी कृषि सामग्री उपलब्ध करून देण्यासाठी कृषि विभागाने नियोजन करावे. बोगस बियाण्यासंदर्भात अनुपालन अहवाल त्वरीत सादर करावा. परराज्यातून तसेच इतर जिल्ह्यातून कोणत्याही मार्गाने बोगस बियाणे येणार नाही, यासाठी चेक पॉईंटवर पोलीस विभागाचे सहकार्य घ्यावे, अशा सुचना त्यांनी दिल्या.
नऊ लाख हेक्टरवर खरीपाचे क्षेत्र
जिल्ह्यामध्ये खरीपाचे सर्वसाधारण 9 लक्ष 2 हजार 70 हेक्टर क्षेत्र असून गत हंगामात 8 लक्ष 97 हजार 370 हजार हेक्टरवर विविध पिकांची पेरणी करण्यात आली होती. यात कापूस 4 लक्ष 65 हजार 562 हजार हेक्टरवर, सोयाबीन 2 लक्ष 81 हजार 674 हेक्टरवर, तूर 1 लक्ष 7 हजार 735 हेक्टरचा समावेश आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फवारणीत विषबाधा होऊ नये म्हणून नाविन्यपूर्ण योजनेतून 90 टक्के अनुदानावर 3533 शेतकऱ्यांना 11.12 लक्ष रुपये खर्च करून संरक्षण किट पुरविण्यात आल्या होत्या. तसेच अजून विविध उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातूनही संरक्षण किट देण्याच्या सुचना या बैठकीत देण्यात आल्या आहेत.