यवतमाळ - कोरोनाचे संकट डोक्यावर असताना, पेरलेले सोयाबीन बियाणे न उगवल्यामुळे शेतकऱ्यांना नवीन संकटाचा सामना करावा लागत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील पेरलेले सोयाबीन बियाणे चक्क वांझ निघाल्याचे समोर आले आहे. या संदर्भात रघुनाथ गोरे, नामदेव राठोड, देऊ राठोड, नामदेव जाधव यांनी पुसद तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली असून त्यांनी संबंधित कंपन्यांवर तातडीने फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. कृषी विभागाकडून याचे पंचनामे करण्यात येत आहेत.
यावर्षी पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी उत्साहाने पेरणी केली. पण पेरलेले बियाणे अनेक ठिकाणी उगवलेच नाही. यामुळे शेतकऱ्यांसह कृषी विभाग हादरला आहे. यात नामांकित कंपन्यांसोबत काही नवख्या कंपन्यांचीही समावेश असल्याची चर्चा आहे.
काही बियाण्यांच्या बॅगमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा आढळला. तसेच पेरल्यानंतर बियाणे उगवले नाही. यामुळे बाजारात विक्रीस आलेले सोयाबीन बॅगमध्ये भरून कंपन्यांनी विकले तर नाही ना, असा संशय शेतकऱ्यांमधून व्यक्त केला जात आहे. बाजारातील टंचाई लक्षात घेता, कंपन्यांनी पैसे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांच्या माथी असे बियाणे मारले तर नाही ना, अशी ओरड आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील जवळपास प्रत्येक तालुक्यात बोगस बियाण्याच्या तक्रारी येत आहेत. त्यांची दखल कृषी विभागाने घेतली असून विभागाकडून पंचनामे करण्यात येत आहेत. शासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन तातडीने चौकशी करावी. तसेच दोषी कंपन्यांचा स्टॉक सील करून त्यांचे परवाने रद्द करावे. शिवाय या बियाण्यांना प्रमाणित करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावरही निलंबन व फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
बियाणे खरेदी करताना कुठली दक्षता घ्यावी ?
शेतकऱ्यांनी कृषी केंद्रातूनच बियाणे, खत, कीटकनाशके घेतली पाहिजे. त्याचे पक्के बिल घ्यावे. पुढे काही अडचण आल्यास, या पक्क्या बिलामुळे दाद मागता येईल आणि फसवणूक होणार नाही, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
हेही वाचा - लॉकडाऊन काळात शेतकऱ्यांच्या कापसावर व्यापाऱ्यांचा डल्ला; हजारो शेतकऱ्यांची बोगस नोंदणी उघड
हेही वाचा - नदी पात्रात बुडून पितापुत्राचा मृत्यू; सूर्य ग्रहणाची विधी करत असतानाची घटना