यवतमाळ - पांढरकवडा रोडवरील पोबरु-ले-आऊट मध्ये घरगुती सिलेंडरमधून वाहनातमध्ये गॅस रिफिलिंग करताना वाहनाने पेट घेतला. यावेळी जवळ असलेल्या सहा सिलेंडर गॅसचा स्फोट झाल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास घडली. यात एक वाहन जळून खाक झाले आहे. सुदैवाने यात काही जीवितहानी झालेली नाही. अडीच महिन्यांपूर्वी याच भागात वाहन रिफेलिंग करत असल्याच्या माहितीवरून तहसील विभागाच्या पुरवठा विभागाने कारवाई केली होती.
हा धंदा राजरोसपणे या परिसरात चालतो
पोबरु ले आऊटमध्ये अनेक ठिकाणी राजरोसपणे घरगुती गॅसमधील रिफिलिंग करून वाहनांमध्ये इंधन म्हणून भरण्यात येते. तसेच, इतर सिलेंडरमध्येही भरून ते विक्री करण्यात येते. हा धंदा राजरोसपणे या परिसरात चालतो. मात्र, प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. काही दिवसांपूर्वी पुरवठा विभागाने कारवाई करूनही त्यानंतर दुर्लक्ष केल्याने हा गोरखधंदा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. या भागात अनेक ठिकाणी घरगुती वापराच्या गॅस वाहनांत इंधन म्हणून राजरोसपणे भरला जातो. असाच प्रकार काल रात्रीच्या सुमारास सुरू असताना एका घरामध्ये अचानक स्फोट झाला. त्यात वाहनांनी पेट घेतला. यानंतर सहा वेळा स्फोटाच्या आवाज आल्याचे परिसरातील नागरिक यांनी सांगितले.
प्रशासनाने दुर्लक्ष केले
ही घटना खुल्या जागेत घडल्याने इतरत्र आग पसरली नाही. तसेच, कुठल्याही प्रकारची जीवीतहानी झाली नाही. मात्र, आगीचे लोळ पाहून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या भागामध्ये मोठ्या प्रमाणात घरगुती गॅस रिफिलिंगचा व्यवसाय सुरू आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने कुठलीही कारवाई होताना दिसत नाही. परिसरात हा व्यवसाय सुरू असल्याने एखाद्या दिवशी दुर्घटना होऊनही मानवी जीविताशी सुरु असलेला खेळ थांबावावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
हेही वाचा - थंडी वाढली, शोकोट्या पेटल्या; गावोगाव गप्पा रंगल्या