यवतमाळ : जिल्ह्यातील पांढरकवडा येथे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने शहरातील काही भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले. मात्र, प्रतिबंधित केलेला भाग पुर्वरत खुला करण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षाऐवजी सेनेच्या नेत्यानेच आंदोलन केले. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री दर्जा असलेले किशोर तिवारी या सत्तेतील नेत्यानीच बिरसा मुंडा चौकात झोपून आंदोलन केले आहे. त्यामुळे सेनेत दोन गट पडल्याची चर्चाही जोर धरत आहे. अशातच सरकारवर विरोधी पक्षातील नेत्यांना आयती संधी मिळाली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचे थैमा सुरुच आहे. पांढरकवडा शहरातही कोरोनाने विळखा घातल्याने प्रशासनाने येथील काही भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला. येथील अधिकाऱ्यांनी प्रतिबंधित क्षेत्रात कार्यरत राहण्याचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी आदेश दिले आहे. येथील कोरोनाबाधितांची साखळी तोडण्यासाठी प्रशासन दिवसरात्र एक करीत आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी कशाचीही तमा न बाळगता हे आंदोलन केले. हे आंदोलन केवळ सरकारचे वाभाडे काढण्यासाठी केले का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर, कोरोनाला पांढरकवड्यातून हद्दपार करायचे आहे की, वाढवायचे आहे असा प्रश्न जनतेला पडलेला आहे.
एकीकडे शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्ष जीवाचे रान करून कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहे. तर, दुसरीकडे, भाजपमधून शिवसेनेत आलेले वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सरकारच्या धोराणाविरोधात जावून पांढरकवडा येथे सोमवारी भर रस्त्यावर आंदोलन सुरू करून प्रशासकीय यंत्रणेची डोकेदुःखी वाढवली होती. महामारीच्या संकटात शासन आणि प्रशासनाला सहकार्य करण्याऐवजी केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी भर रस्त्यावर सील केलेला भाग पूर्वरत खुला करण्याच्या मागणीसाठी तिवारी यांचे आंदोलन हा चर्चेचा विषय बनला आहे.