यवतमाळ - राज्यात महाविकास आघाडीच नवे समीकरण असले तरी शिवसेना म्हणून पुढील काळात स्वबळावर सर्व निवडणुका लढवायच्या आहेत. यासाठी तयारीला लागावे, असे आवाहन राज्याचे वनमंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी शिवसैनिकांना केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे जिल्ह्यातील महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
![शिवसेनिकांनो निवडणुकीच्या तयारीला लागा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-ytl-01-sanjay-rathod-vis-byte-7204456_22112020195344_2211f_1606055024_1000.jpg)
रविवारी बलवंत मंगल कार्यालयात जिल्ह्यातील शिवसैनिकांनी दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमामध्ये बोलताना वनमंत्री संजय राठोड यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी राठोड यांनी स्वबळावर निवडणुका लढण्याची भूमिका घेतल्यामुळे महाविकास आघाडीत नवा वाद उफाळण्याची देखील चिन्हे आहेत.
स्थानिक निवडणूक स्वबळावर लढणार-
शिवसैनिकांनो आगामी नगर पंचायत, नगर परिषद, जिल्हापरिषदच्या सर्व निवडणुका स्वबळावर लढायच्या आहेत. त्यादृष्टीने जोमाने तयारीला लागा. जिल्ह्यातील काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये आपल्यापेक्षाही जास्त भांडणे आहेत. त्यामुळे 50 टक्के अशासकीय समित्यांवर शिवसैनिकांच्या नियुक्त्या केल्या जातील. मात्र आता त्यांची वाट बघणार नाही, अशीही घोषणाच महाविकास आघाडीचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांनी केली आहे.
राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचे प्रयत्न-
राज्यात सत्ताधारी असतानाही आज शिवसेनेला त्रास होत आहे. मी मंत्रिमंडळात असल्याने मला सर्व माहिती आहे. ते सर्व सांगता येणार नाही. मात्र, मुख्यमंत्री उद्धवजींना याचा देखील त्रास होतोय. केंद्रातून राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याचाही आरोप राठोड यांनी यावेळी केला.