यवतमाळ- कोरोना विषाणू संसर्ग असलेल्या जिल्ह्यातील तीन पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने निगेटिव्ह आले. जिल्ह्यासाठी दिलासा देणारी ही बाब असून जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग अभिनंदनास पात्र आहे. मात्र, कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला नाही. त्यामुळे या आव्हानाचा सामना करण्यासाठी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अतिरिक्त 500 खाटांचे सुसज्ज रुग्णालय उभारण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णालयाच्या पुर्वतयारीनिमित्त आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, डॉ. बाबा येलके उपस्थित होते.
वैद्यकीय महाविद्यालयात 765 नियमित खाटा आहेत. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर येथील जुन्या रुग्णालयात 220 खाटांचे तर मुले आणि मुलींच्या वसतिगृहात प्रत्येकी 125 असे जवळपास 500 खाटांचे रुग्णालय येत्या दहा बारा दिवसात तयार होईल. याचा लाभ यवतमाळ आणि वाशिम तसेच इतरही जिल्ह्यातील नागरिकांना होणार आहे. इतर राज्यातून जे नागरिक यवतमाळ येथे येत आहे, सर्वांच्या सहकार्याने कोरोना विरुध्दची ही लढाई जिंकायची आहे.
नागरिकांनी शासन आणि प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे. नागरिकांनी घरातच राहावे. बाहेर फिरु नये. तसेच स्वच्छता ठेवणे, वारंवार हात स्वच्छ धुणे, एकमेकांच्या संपर्कात न येणे, अत्यावश्यक कारणासाठी बाहेर गेले तर अंतर राखणे आदी सुचना आपल्या भविष्यासाठी महत्वाच्या आहेत. त्या कृपाकरून सर्वांनी पाळाव्यात असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.