यवतमाळ- राईड फॉर चेंज सायकल अभियान अंतर्गत पर्यावरण संरक्षणाविषयी लोकांना जागृत करण्यासाठी सायकल यात्रा निघाली होती. २७ जानेवारी २०१९ ला जम्मू विमानतळ येथून या सायकल यात्रेची सुरुवात झाली होती. ही सायकल यात्रा काल ७ नोव्हेंबर रोजी शहरात पोहोचली. यात्रेत सहभागी असलेले ग्रीन मॅन नरपत सिंह यांनी शहरात पर्यावरण जनजागृतीचा संदेश दिला.
नरपत सिंह राजपुरोहित हे राजस्थान राज्यातील बाडमेर जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. त्यांनी देशभरात २४ हजार किलोमीटर पेक्षा जास्त प्रवास सायकलने केला आहे. राईड फॉर चेंज सायकल अभियान हे पर्यावरण जनजागृती निर्माण करण्यासाठी निघालेली सर्वात मोठी सायकल यात्रा असल्याचे बोलल्या जाते. जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तराखंड, गुजरात असे १२ हजार ६८३ किलोमीटरचा प्रवास करत ही सायकल यात्रा महाराष्ट्रातील यवतमाळ येथे दाखल झाली. यात्रेच्या माध्यमातून तरूणांना शिक्षण, पर्यावरण, आरोग्य आदीबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्याचबरोबर, रोज दोन-तीन वृक्षारोपण करण्यात येते. तसेच वृक्ष भेट दिली जाते.
सहा वर्षात केली ८४ हजार ५०० वृक्षांची लागवड
जास्तीत जास्त लोक पर्यावरणाबाबत जागृत होतील तेव्हाच पर्यावरण समतोल राखला जाईल, असे राजपुरोहित यांनी सांगितले. शिप्परबडी राईड फॉर चेंज सायकल अभियानातून संदेश देण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शाळेत शिक्षकांमुळे पर्यावरण प्रेमी बनू शकलो, असेही त्यांनी सांगितले. नरपत सिंह राजपुरोहित यांनी मागील ६ वर्षात ८४ हजार ५०० वृक्ष लागवड केली आहे. पर्यावरण प्रेमीचा हा विश्व वक्रम होऊ शकतो. त्यांनी वन्य प्राण्यांसाठी २३०० पेक्षा जास्त घरटे लावले आहेत. हुंडा प्रथेला विरोध करीत त्यांनी ही सुरूवात घरातूनच केली. बहिणीच्या लग्नात २५१ वृक्ष भेट देऊन एक आदर्श निर्माण केला. इतकेच नव्हे तर, बहिणीच्या सासूरवाडीला जाऊन तेथेही प्रत्येक घरी दोन वृक्ष भेट दिले. अखेरच्या क्षणापर्यंत हा संघर्ष सुरू राहील, असा संकल्प राजपुरोहित यांनी बोलून दाखवला.
हेही वाचा- यवतमाळ : राशन दुकान मालकावर गहू बाजारात विक्रीसाठी आणल्याचा आरोप