यवतमाळ - कोल्हापूर आणि सांगलीत आलेल्या पुरामुळे भीषण संकट निर्माण झाले आहे. तेथे मदत पाठविण्यासाठी यवतमाळ येथील नागरिकही सरसावत आहेत. जिल्ह्यात विविध ठिकाणावरून मदत केंद्राकडे मदत येत आहे. यवतमाळ येथील आयुर्वेदिक महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. अशोक गिरी यांनी देखील 76 हजारांची वैयक्तिक मदत शासनाला दिली आहे.
यामध्ये 51 हजार हे पंतप्रधान सहाय्यता निधीला तर, 25 हजाराची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली आहे. या मदतीचे दोन्ही धनादेश गिरी यांनी बुधवारी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याकडे सुपूर्त केले आहे. अशाच प्रकारची मदत प्रत्येकाने करावी, जेणेकरून पुरग्रस्तांना मदत होईल, असे आवाहनही गिरी यांनी यावेळी केले.
कोल्हापूर व सांगली या ठिकाणी आलेल्या महापुरामुळे अनेक कुटुंबावर संकट ओढवले आहे. त्यांचे दुःख आपण कमी करू शकत नसलो, तरी त्यांना मदत करून नव्याने जगण्यासाठी एक उभारी देऊ शकतो.