यवतमाळ - दिग्रस मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री संजय देशमुख आणि आर्णी मतदार संघात माजी आमदार राजू तोडसाम यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून बंड पुकारले आहे. दिग्रस ही जागा युतीमध्ये शिवसेनाकडे, तर आर्णी मतदार संघात भाजपने उमेदवार बदलला आहे.
दिग्रस विधानसभा मतदारसंघात शिवसेना उमेदवार महसूलराज्यमंत्री संजय राठोड यांच्या विरोधात भाजप नेते माजी मंत्री संजय देशमुख यांनी बंडखोरी करीत निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. देशमुखांच्या बंडखोरीमुळे संजय राठोड यांच्यापुढे आव्हान निर्माण झाले आहे. २०१४ च्या निवडणुकीत राज्यात सत्तांतर होताच माजी मंत्री संजय देशमुख यांनी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर दिग्रस विधानसभा मतदारसंघात त्यांनी निवडणुकीच्या दृष्टीने तयारी केली. मात्र, आता भाजप-सेना युतीत हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने संजय देशमुख यांनी बंडखोरी करीत निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे.
हेही वाचा - दिग्रस आणि आर्णी मतदार संघात भाजपची बंडखोरी
तर आर्णी मतदारसंघात भाजपने उमेदवारी नाकारलेल्या विद्यमान आमदार राजू तोडसाम यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. या मतदारसंघात भाजपने माजी आमदार डॉ. संदीप धुर्वे यांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे. राजू तोडसाम यांची कारकीर्द वादग्रस्त ठरल्याने शिवाय स्थानिक भाजप नेतृत्वाने देखील उमेदवार बदलण्याची मागणी केली असल्यामुळे तोडसाम यांचा पत्ता कट करून धुर्वेंना भाजपने संधी दिली. मात्र, नाराज राजू तोडसाम यांनी धुर्वेंविरोधात बंड करीत उमेदवारी दाखल केली.
हेही वाचा - आर्णी विधानसभेचे तिकीट कापल्याने भाजपचे आमदार राजू तोडसाम करणार बंडखोरी