यवतमाळ - नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात येत असताना पावसाने हजेरी लावली. तसेच आज सकाळी देखील पावसाची रिपरिप सुरूच होती. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. तसेच वातावरणात अधिक गारवा निर्माण झाला. दिवसा पाऊस, तर रात्री बोचरी थंडी पडत आहे.
जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून ढगाळ वातावरण निर्माण झालेले आहे. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. जिल्ह्यात नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पावसाने हजेरी लावली. मागील दोन दिवसापासून जिल्ह्यातील काही तालुक्यात कधी तुरळक, तर कधी जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे रब्बी हंगामातील गहू व हरभरा या पिकांना चांगला फायदा होत आहे, तर खरिपातील नगदी पीक असलेला कापूस ओला होत असल्याने शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे. तूर पिकावर देखील किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. या ढगाळ वातावरणामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढू लागल्याचे कृषी विभागाने सांगितले.
गेल्या आठवड्याभरापासून थंडीचा जोर वाढला होता. मात्र, अवकाळी पावसामुळे दिवसा ढगाळ वातावरण, तर रात्रीच्या सुमारास बोचऱ्या थंडीला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.