यवतमाळ - काँग्रेसची प्रचार यंत्रणा थंडावल्याचे म्हणले जात होते. मात्र, काँग्रेसचे राष्ट्रिय नेते राहुल गांधी यांच्या प्रचार सभेमुळे काँग्रेसमध्ये उर्जा निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. गांधी म्हणाले, एक एक करून सर्व उद्योग या देशातील मूठभर १५-२० लोकांच्या स्वाधीन करण्याचे काम नरेंद्र मोदी करत आहेत. टेलीव्हीजन आणि वर्तमानपत्रातील दररोज दिसणारे नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र फुकटात दिसत नाहीत. त्यासाठी मोदी जनतेचा पैसा खर्च करतात, असा घणाघात खासदार गांधी यांनी केला. ते जिल्ह्यातील वणी येथे आयोजित प्रचारसभेत बोलत होते.
हेही वाचा - बाळा..मी महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचा अध्यक्ष आहे, पवारांची मुख्यमंत्र्यांना मार्मिक समज
मोदी हे अदानी आणि अंबानीचे लाऊडस्पीकर असल्याची टीकाही राहुल गांधी यांनी मोदींवर केली आहे. ज्या पध्दतीने हे सरकार काम करत आहे, त्यामुळे येत्या सहा महिन्यात बेरोजगारी दुप्पट होईल, असा दावा राहुल यांनी केला. जे जनतेचे मुद्दे आहेत, त्यावर मोदी बोलतच नाहीत तर ३७० आणि इतर मुद्यावर बोलतात. या ३७० चा महाराष्ट्रात काय संबंध, असा सवालही त्यांनी केला.
भलतेच मुद्दे उपस्थित करून ते जनतेचे लक्ष विचलित करण्याचे काम करत असल्याचे गांधी म्हणाले. उद्योगपतींचे ५० हजार कोटी रुपयांचे कर्ज या सरकारने माफ केले. सव्वा कोटी रुपयांचा टॅक्सही या सरकारने उद्योगपतींना माफ केल्याचे ते म्हणाले. भारताची अर्थव्यवस्था सध्या अदानी आणि अंबानी चालवत आहेत. त्यामुळे या सरकारकडून शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार नाही, असे राहुल गांधी म्हणाले.
हेही वाचा - शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी मिळाली नाही, आदित्य ठाकरेंचा भाजपला घरचा आहेर