यवतमाळ- गेल्या दीड महिन्यापासून संपूर्ण जिल्ह्यावर कोरोनाचे संकट घोंगावत आहे. पुसद भागातील माळपठारावर पाणी टंचाईचे संकट गडद झाले आहे. सध्या माळपठार भाग कोरोनामुळे बाहेरून आलेल्या मजुरांमुळे गजबजून गेला आहे. यातच या भागातील लोकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. कोरोनाशी दोन हात करताना जनतेला पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
आधीच एक वर्षांपासून 40 गावे प्रादेशिक माळपठार पाणीपुरवठा योजना नियोजन शून्यतेमुळे ठप्प आहे. पुसद तालुक्यातील पैनगंगेच्या काठावरील लोहरा इजरा येथील विहिरीत पाणीच नाही. टँकरच्या मदतीने विहिरीत पाणी सोडले जाते. टँकर आला की विहिरीवर एकाच झुंबड उडते.
जीवावर उदार होऊन विहिरीतील पाणी काढण्यासाठी लोकांची धावपळ सुरु होते. यात सोशल डिस्टंसिग पाळले जात नाही. तहान भागविणे महत्वाचे की कोरोना संबंधी काळजी घेणे महत्वाचे यापैकी लोक तहान भागवण्याला प्राधान्य देत आहेत.