यवतमाळ- राज्यात सध्या भाजपमध्ये विरोधी पक्षातील नेत्यांची मेगाभरती सुरू आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे प्रमुख नेते, आमदार भाजपमध्ये पक्षप्रवेश करत आहेत. महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी भाजपकडून इतर पक्षाच्या उमेदवारांना, राजकीय नेत्यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची भिती दाखवली जात आहे. भाजपमध्ये या नाहीतर जेलमध्ये पाठवू, असा प्रकार सुरू आहे. याच कारणाने अनेक काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार, राजकीय नेते भाजपमध्ये दाखल होत असल्याचा आरोप विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी केला. ते यवतमाळमध्ये काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी आले असता ई-टीव्हीशी बोलत होते.
भारतीय जनता पार्टी कडून सध्या मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश देणे सुरू आहे. कोणावरती दबाव आणून तर कोणाचे भ्रष्टाचाराचे प्रकरण उकरून काढू असे सांगून पक्षामध्ये प्रवेश देत आहे. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सध्या बीजेपीवासी झाले आहे. त्यांना आपल्यावर कारवाई होईल या भीतीपोटी, तर कोणी आपल्या मुलांचे भविष्य काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात नसल्याने त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश करीत आहे. सरकारची ही पद्धत चुकीची असून काँग्रेस हा एक विचार आहे कोणी इतर पक्षात पक्ष प्रवेश केल्याने काँग्रेस संपणार नसल्याचेही माणिकराव ठाकरे यांनी बोलताना सांगितले.