यवतमाळ - बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने यवतमाळ साहित्य संमेलनाच्या उद्घाटक वैशाली येडे यांना यवतमाळ - वाशिम मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यांच्या निवडणूक प्रचाराच्या खर्चासाठी प्रहारने निधी संकलन मोहिम राबवली. यासाठी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी यवतमाळमध्ये झोळी घेऊन लोकांकडून पैसे गोळा केले.
प्रहार संघटनेने यवतमाळ वाशिम मतदारसंघातून शेतकऱ्याच्या विधवेला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्धाटक वैशाली येडे यांना येथून उमेदवारी देण्यात आली आहे. वैशाली या व्यवसायाने अंगणवाडी कार्यकर्ती आहेत. निवडणून आले तर आपण शेतकरी, अंगणवाडी कार्यकर्ती, आशा वर्कर आणि इतर कामगारांच्या प्रश्नांना न्याय देऊ असे येडे म्हणाल्या.
सोमवारी दुपारी वैशाली येडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. अर्ज दाखल करण्याआधी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. त्यानंतर बैलगाडीत जाऊन अर्ज दाखल करण्यात आला. निवडणूक लढण्यासाठी वैशाली येडे किंवा प्रहार संघटनेकडे पैसे नाहीत. त्यामुळे लोकांकडून पैसे गोळा करण्यात आल्याचे प्रहारच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.