मुंबई - अभिनेत्री ऐश्वर्या राय तिच्या नात्यामुळं अलीकडे भरपूर चर्चेत असते. दुसरी ती चर्चेत असते तिची लेक आराध्यामुळे. सतत सावलीसारखी ती आराध्याबरोबर असते. काही दिवसांपूर्वी ती पती अभिषेकबरोबर दिसल्यानंही ती पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आली होती.
हे जोडपं त्यांची मुलगी आराध्याच्या शाळेच्या वार्षिक कार्यक्रमात गेलं होतं. या जोडप्याच्या उपस्थितीनं त्यांच्या घटस्फोटाच्या अफवांना पूर्णविराम मिळाला. त्या दिवसानंतर आज 23 डिसेंबर रोजी पहाटे ऐश्वर्या राय बच्चन मुंबई विमानतळावर दिसली. तिच्याबरोबर अर्थात तिची मुलगी आराध्याही होती.
पापाराझींनी सोमवारी पहाटे ऐश्वर्या आणि आराध्याला मुंबई विमानतळाबाहेर पाहिलं. सोशल मीडियावर आई आणि मुलीचा लेटेस्ट व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये ऐश्वर्या राय आणि आराध्या मॅचिंगमध्ये दिसत आहेत. आई आणि मुलीनं विमानतळासाठी कॅज्युअल काळ्या रंगाचे पोशाख परिधान केलं होतं. काळ्या रंगाच्या लूकमध्ये आई-मुलीची जोडी खूपच सुंदर दिसत आहे.
यावेळी आराध्याच्या उंचीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 13 वर्षांची आराध्या उंचीमध्ये तिच्या आईच्या बरोबरीची दिसत होती. कारमधून उतरताना आणि विमानतळाच्या आत जाताना आई आणि मुलगी दोघीही हसल्या आणि त्यांनी पॅप्ससाठी पोझ दिल्या. दरम्यान, ऐश्वर्या पापाराझींना नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि मेरी ख्रिसमसच्या शुभेच्छा देत विमानतळाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत जाते.
20 डिसेंबर रोजी अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. ऐश्वर्या राय बच्चन आपली मुलगी आराध्याला चिअर करण्यासाठी पती अभिषेक बच्चन आणि सासरे अमिताभ बच्चन यांच्याबरोबर आली होती. तिघांनाही एकत्र पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला. दरम्यान, शाळेच्या आतून ऐश्वर्या राय बच्चनचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये अभिनेत्री तिच्या मोबाइल फोनवर तिच्या मुलीचा परफॉर्मन्स टिपताना दिसत होती.