यवतमाळ - महावितरण विभागाने अवाजवी वीज बिल पाठवल्याच्या अनेक घटना कानावर येत असतात. अशीच एक घटना झरीजामनी तालुक्यामध्ये घडली आहे. मुकुटबन येथून जवळच असलेल्या गणेशपूर येथील नानाजी साधू निखाडे (वय ६५) यांना तब्बल १ लाख २८ हजारांचे वीज बिल आले आहे.
मोल-मजुरी करून जगत असलेले हे वृद्ध कुटुंब एका चंद्रमोळी झोपडीवजा घरात राहते. त्यांच्याकडे ३ बल्ब व १ टेबलफॅन एवढीच विद्युत उपकरणे आहेत. या उपकरणांचे बिल आजवर ३०० ते ३५० रुपयांच्या दरम्यान येत होते. मात्र, ऑगस्ट महिन्यात आलेल्या बिलाने त्यांना झटकाच बसला. त्यांना आलेल्या बिलाची रक्कम तब्बल १ लाख २८ हजार इतकी आहे. ३ बल्ब व १ टेबलफॅन असलेल्या झोपडीत आलेल्या या अवाढव्य बिलामुळे या म्हाताऱ्या दाम्पत्यापुढे एवढे बिल कसे भरायचे असा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.