यवतमाळ - जिल्हा परिषदेच्या सभागृहात सभा घेण्याची मागणी मान्य करण्यात न आल्याने सर्वसाधारण सभेत विरोधकांनी गोंधळ घातला. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. आता विरोधी पक्षाने शिक्षकांच्या बदल्यावरून सत्ताधारी महाविकास आघाडीला घेरण्याची रणनीती आखली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना शिक्षकांच्या बदल्या करण्याचे अधिकार आहे का? असे म्हणत माजी उपाध्यक्ष श्याम जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत बदली प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले.
स्थायी समिती आणि विषय समितीमधील रिक्त असलेल्या जागा भराव्यात अशीही मागणी करण्यात आली. मात्र, या जागा भरावयाच्या नाही. विरोधक प्रश्न विचारतील या भीतीने सत्ताधारी सदस्यांच्या अधिकारावर गदा आणत असल्याचा आरोप भाजप सदस्यांनी केला आहे. ऑनलाइन सर्वसाधारण सभा न घेता सोशल डिस्टंसिंग पाळून नेहमीसारखी सभा घ्यावी, असे विरोधी पक्षातील भाजपा सदस्यांचे म्हणणे होते. परंतु, सत्ताधाऱ्यांनी हा त्यांचा आग्रह न मानल्याने या आठवड्यात भाजपा सदस्यांनी जमिनीवर बसत ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतर विरोधक पुन्हा आक्रमक झाले आहेत. शिक्षकांच्या बदल्या आयुक्तांनी नाकारल्या. याप्रकरणी उच्च न्यायालयाने दिलासा दिला नाही. तसेच सोळाही तालुक्यातील शिक्षकांना यवतमाळ येथे आणण्यामागे काय कारण आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तर एका राजकीय नेत्याच्या नातेवाईकाला खासगी शाळेतून जिल्हा परिषदेच्या शाळेत आणण्यात आले, अशी पोलखोल जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्याम जयस्वाल यांनी केली.
सीईओ यांना शिक्षकांच्या बदल्या करण्याचे अधिकार आहेत का? आयुक्तांनी या बदल्या नाकारल्या. सर्व तालुक्यातील शिक्षकांना यवतमाळ येथे आणून ठेवण्यात आले. आम्ही सत्तेत असताना महागाव, उमरखेड, पुसद येथे शिक्षकांची कमतरता असलेल्या शाळेत शिक्षक उपलब्ध करून दिले होते, असे श्याम जयस्वाल यांनी सांगितले.