यवतमाळ - लोकसभा निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी पोलीस विभाग सज्ज झाला आहे. आंतरजिल्हा बॉर्डर व दोन आंतरजिल्हा सीमांवर नाकाबंदी करण्यात आली आहे. निवडणुकीच्या काळात जिल्ह्यात पोलीस कर्मचार्यांसोबत जिल्ह्याबाहेरील २ हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात राहणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एस. राजकुमार यांनी दिली.
लोकसभा निवडणूक शांततेत व भयविरहित वातावरणात व्हावी, यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने चोखव्यवस्था केली आहे. निवडणुकीच्या काळात आवश्यक असलेली सर्व तयारी जिल्हा प्रशासनाने केलेली आहे. निवडणुकीच्या काळात सुरक्षायंत्रणांची जबाबदारी मोठी आहे. त्यादृष्टीने पोलीस विभागही सज्ज आहे. निवडणुकीच्या काळात अनेक बाबींची उलाढाल होण्याची शक्यता आहे. त्यासाठी जिल्ह्यांतर्गत असलेली २०, तर आंतरजिल्हा दोन अशा २२ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे.
या ठिकाणांवरून वाहनांची तपासणी केल्याशिवाय वाहने सोडली जाणार नाहीत. शिवाय मतदान केंद्रांपासून भरारी पथक, गस्ती पथक, स्ट्राँग रूम, नाकाबंदी, अशा सर्व आघाड्यांवर प्रशासनाने नियोजन केले आहे. त्यासाठी २०६ अधिकारी, ३ हजार पोलीस कर्मचारी, ८०० गृहरक्षक दल, एसआरपीएफच्या ८ कंपन्या तैनात राहणार असल्याचेही एम. राजकुमार म्हणाले.