यवतमाळ - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक लोकप्रतिनिधी विकास कामे झाल्याचा दावा करतात. मात्र, आजही जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील पिंपळगाव येथे गावात जाण्यासाठी साधा रस्ता सुद्धा नाही. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही त्यांची दखल घेतली जात नाही. स्वातंत्र्यप्राप्तीपासून या गावाची फरफट चालू आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे ठरवले आहे.
हे वाचलं का? - २५ वर्षांपासून पिंपळखुटा गावाची वाट बिकट; आमदारांचे 'चैनसुख' उडवण्याचा ग्रामस्थांचा निर्धार
राळेगावपासून जवळपास १० ते १८ किलोमीटरवर पिंपळगाव वसलेले आहे. हे गाव राळेगाव मतदारसंघात येते. गेल्या ५ वर्षांपासून या मतदारसंघावर भाजप आमदार अशोक उईके यांची सत्ता आहे. त्यापूर्वी काँग्रेस आमदार वसंत पुरके यांनी सत्ता गाजवली.
हे वाचलं का? - पेमरेवाडी मुलभूत सुविधांपासून वंचित; विकासासाठी भाजपवासी झालेले वैभव पिचड आता तरी लक्ष देतील का?
गावात मुलभूत सोईसुविधा उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना प्रत्येक कामासाठी राळेगाव गाठावे लागते. मात्र, गावातून बाहेर निघण्यासाठी रस्ताच नाही. ग्रामस्थांनी कशीतरी पायवाट काढली. मात्र, त्यावर पावसाळ्याच्या दिवसात गुडघाभर चिखल असते. शिवाय या रस्त्यानेच शेतामध्ये देखील जावे लागते. त्यामुळे पावसाळ्यामध्ये चिखल तुडवत शेतामध्ये जावे लागत आहे. शेतीचे साहित्य देखील शेतात नेता येत नाही. त्यामुळे शेती पडीक ठेवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आम्ही खायचे काय? असा प्रश्न ग्रामस्थांसमोर उभा आहे.
हे वाचलं का? - पुन्हा किती गर्भवती महिलांना खाटेवरून रुग्णालयात न्यायचं? करवाडी ग्रामस्थांचा आमदारांना प्रश्न
ग्रामस्थांनी अनेकदा लोकप्रतिनिधींकडे डांबरी रस्ता बनवून देण्याची मागणी केली. मात्र, प्रत्येक वेळी त्यांना आश्वासने मिळाली. त्यामुळे डांबरी रस्ता झाल्याशिवाय गावात एकाही नेत्याला पाय ठेवू देणार नसल्याचा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. तसेच 'रोड नाही, तर व्होट नाही' असे म्हणत विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्यण घेतला आहे.
हे वाचलं का? - बसवराज पाटलांच्या मतदारसंघात गोटेवाडीवासियांची फरफट, आमदारांनी दाखविलाच नाही 'विकासा'चा रस्ता