यवतमाळ - जिल्ह्यातीळ बाभूळगाव तालुक्यातील राणीअमरावती येथील दिलेश परडखे या शेतकऱ्याने ट्रॅक्टर भंगारातील साहित्यापासून घरीच तयार फवारणी यंत्र लावून शेतात फवारणी सुरू केली आहे. ते यंत्र त्यांनी स्वतः तयार केले आहे. या जुगाड तंत्रज्ञानामुळे फवारणी करताना कुठलीही विषबाधा फवारणी करणाऱ्या व्यक्तीला होत नाही. शिवाय एका दिवसात तब्बल 35 एकर क्षेत्रात फवारणी होत असल्याने चार हजार रुपयांची दिवसाला बचत होत आहे. या यंत्रांची संपूर्ण पंचक्रोशीत चर्चा होत आहे.
कर्नाटकातून मागवली रबरी चाके -
परखडे हे दोन वर्षापूर्वी कर्नाटक मधील नारकंडा जिल्ह्यातील हुबळी येथे गेले होते. त्यावेळी ट्रॅक्टरला बारीक चार इंच रुंदीचे चाके लावल्याची त्यांना दिसून आले. मागील दोन वर्षापासून त्यांच्या डोक्यात एकच विचार येत होता, आपल्याकडील छोट्या ट्रॅक्टरला अशीच चाके लावल्यास त्याचा उपयोग शेतीमध्ये करता येईल. त्यामुळे त्यांनी हुबळी येथून ट्रॅक्टरला त्यांनी समोर 3 फूट आणि मागील चाक 4 फूट उंचीची मोठी रबरी चाके लावली. यासाठी त्यांना 84 हजार रुपये या चार चाकांसाठी मोजावे लागले. यातून त्यामुळे सोयाबीनसारख्या दाट पिकांत सुद्धा योग्य पध्दतीने आणि योग्य दाबाने फवारणी होते. एकसारखी फवारणी झाल्याने पिकांवरील अळी नष्ट करण्यासाठी या फवारणीचा योग्य परिणाम देखील जाणवत आहे.

डवरणी सुद्धा योग्य पद्धतीने -
या ट्रॅक्टरद्वारे पिकांची डवरणी सुध्दा करता येते. त्यामुळे पिकांना योग्य प्रमाणात ऑक्सिजनसुध्दा मिळतो आणि असे करताना पिकांचे नुकसान होत नाही. त्यामुळे पिकांच्या वाढीस याचा लाभ होतो. तसेच कपाशी व इतर पिकात या ट्रॅक्टरद्वारे योग्य प्रकारे डवरणी करता येते.

विषबाधेचा धोका नाही -
जिल्ह्यात तीन वर्षापूर्वी 23 शेतकरी व मजुरांचा फवारणी करताना विषबाधा होऊन मृत्यू झाला होता. पण यामुळे कीटकनाशके फवारणी करताना ट्रॅक्टरवरील व्यक्ती थेट किटकनाशकाच्या संपर्कात येत नसल्याने विषबाधा होत नाही. यासाठी त्यांनी घरी असलेल्या 200 लिटर प्लास्टिक ड्रमचा वापर फवारणी द्रावण ठेवण्यासाठी केला. त्याला वेल्डिंग करून घेत त्या ड्रमला दोन बाजुंनी अडजेस्टेबल लांब पाईप लावला. त्याला 11 नोजल दिले. त्यामुळे एकावेळी 14 तास म्हणजेच जवळपास दोन एकरवर फवारणी करता येते. तसेच तूर सारख्या पिकात सुध्दा यामुळे फवारणी 9 फूट उंचीपर्यंत करता येते. यासाठी त्यांना 20 हजाराचा खर्च आला असून आता आजूबाजूच्या भागातील शेतकरी त्यांना फवारणीसाठी बोलवत आहेत.

हे ही वाचा -चिंताजनक..! कोविड - 19 पीडित गर्भवती महिलांना प्री-एक्लांपसियाचा अधिक धोका
मजुरांचा खर्च झाला कमी -
शेतातील सोयाबीन कपाशी व तूर या पिकांवर फवारणी करण्याकरता एका मजुराला तीनशे रुपये मजुरी द्यावी लागते. शिवाय दिवसाला दोन ते तीन एकरच फवारणी होते आणि यातून पाच ते सात टक्के पिके फवारणीपासून वंचित राहतात. त्यामुळे संपूर्ण शेतात फवारणी करताना किमान पाच हजार रुपयांची मजुरी द्यावी लागते. मात्र आता हेच काम एक हजार 500 रुपयांच्या डिझेलमध्ये होत आहे.
हे ही वाचा - निवडणुका जवळ आल्या, की 'हे' ब्लॅकमेलिंगचा धंदा करतात -छगन भुजबळ