यवतमाळ - जिल्ह्यात वरूण राजाने बऱ्याच दिवसांपासून दांडी मारल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यामुळे 'धोंडी धोंडी पाणी दे' असे म्हणत सावंगा(बु.) येथील आकाश शिंदे, ज्ञानेश्वर शेगर आणि सहकारी शहरात पावसासाठी लोकगीताने वरुणराजाला विनवणी करीत आहेत.
पाऊस मोठ्या प्रमाणात बरसावा म्हणून ग्रामीण भागातील नागरिक धोंड्याचे आयोजन करताना दिसत आहे. त्यासाठी एका लाकडी काठीला कडूलिंबाच्या झाडाच्या फांद्या व त्यामध्ये बेडूक बांधल्या जात आहे. ही काठी दोन तरुण स्वतःच्या खांद्यावर घेऊन नागरिकांना "धोंडी धोंडी पाणी दे, पाण्याचे दिवसं पाणी मोठं हौसं, साळ सोके कोलो भोके, इचकल बेंडकी पाणी बुलाओ, काळा कचुरा खोबऱ्याची वाटी, बेंडकी बांधली पाण्यासाठी, मारुती राया सत्याचा, पाड झाला मोत्याचा" असे म्हणत लोकगीताच्या माध्यमातून पूजाअर्चना करून पाण्यासाठी वरुण देवतेला साकडे घातले आहे.
जूनपासून मृग नक्षत्राला म्हणजेच पावसाळ्याला सुरुवात झाली. मात्र जून महिन्याच्या शेवटी व जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली तेव्हापासून अजूनही पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहेत. आता पाऊस यावा म्हणून ग्रामीण भागातील शेतकरी धोंडी काढून पाऊस बरसण्यासाठी वरुण देवतेला प्रार्थना करताना दिसत आहे. तेव्हा वरुण देवता ग्रामीण भागातील नागरिकंना कधी प्रसन्न होते आणि पाण्याची बरसात कधी होते याकडेच शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहे.