यवतमाळ - शहरात प्रतिबंधित क्षेत्रालगत असलेल्या परिसरातील एका नागरिकाचा कोरोना रिपोर्ट पोझिटीव्ह आला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलत हा संपुर्ण परिसर सील केला. या परिसरातील 100 पेक्षा जास्त नागरिकांना क्वॉरेंटाईन करण्यात आले असून परिसरावर ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येत आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही 10 झाली आहे. बुधवारी रात्री कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर पवारपुरा भागातून शंभरपेक्षा अधिक नागरिकांना रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले. या भागालगतचा 3 किलोमीटरपर्यंतचा परिसर पूर्णपणे सील करण्याची प्रक्रिया राबवली आहे.
अंगणवाडी सेविका, आशा वर्करच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याची तपासणी आणि सर्व्हे देखील सुरू करण्यात आला आहे. नगरपरिषदेकडून निर्जंतूकीकरण करणयात येत आहे. या भागातील कुठल्याही नागरिकाला बाहेर पडता येणार नाही. या परिसरात बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांची डॉक्टरांमार्फत थर्मल स्क्रिनिंगद्वारे तपासणी करण्यात येत आहे.