यवतमाळ - कोव्हिड संकटामुळे बंद असलेल्या पाचवी ते आठवीच्या शाळा अखेर आजपासून सुरू करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यासाठी पालकांचे संमतीपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याची तपासणी करण्यात आली. तर शासनाच्या निर्देशानुसार संपूर्ण शाळा सॅनिटाइज करण्यात आल्या.
जिल्ह्यात एक लाख 81 हजार विद्यार्थी
जिल्ह्यातील पाचवी ते आठवीच्या 2 हजार 718 खासगी व शासकीय शाळा आहे. सुरुवातीला 9 ते 12पर्यंतच्या शाळा 23 नोव्हेंबरपासून सुरू झाल्या आहेत. तर आजपासून पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहे. यात एक लाख 81 हजार 173 विद्यार्थी आहे. प्रत्येक शाळेत शासनाच्या नियमानुसार सर्व उपाययोजना राबविण्यात आलेल्या आहे. विद्यार्थ्यांचे तापमान, मास्क, सोशल डिस्टन्स ठेऊन वर्गात प्रवेश देण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांत आनंदाचे वातावरण
आजपासून शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला. कालपर्यंत विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत होते. यात लहान विद्यार्थ्यांना काही प्रमाणात अडचण होत होती. मात्र, आता थेट शिक्षकांना आपल्या अडचणी सांगू शकणार आहेत. त्यामुळे मागील 10 महिन्यापासून घरी असलेल्या विद्यार्थ्यांत आनंदाचे वातावरण होते.