यवतमाळ - राष्ट्रीय महामार्गावर होत असलेल्या जनावर तस्करीचा कंटेनर जप्त करून 65 गोवंशाची सुटका करण्यात आली आहे. यात 8 आरोपींना रंगेहाथ अटक करून कंटेरनसह 24 लाख 87 हजार 600 रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पांढरकवडा पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास पिंपळखुटी येथे केली.
आठ आरोपींना अटक
या कारवाईमध्ये अफसर कुरेशी कदिर कुरेशी (26, रा. मध्यप्रदेश), अनुज कुमार (27, रा. उत्तरप्रदेश), वसीम खाँ लई खाँ (38 रा. मध्यप्रदेश), राजोद्दीन वाहिद खान (26), शरीफ कुरेशी फरीद कुरेशी (रा. मध्यप्रदेश), आकाश कुडमेथे, राम मेश्राम (दोघेही रा. पाटणबोरी) तसेच आमिर उर्फ भुऱ्या मलनस (रा. पांढरकवडा) अशी अटक करण्यात आलेल्या गोवंश तस्करांची नावे आहेत.
25 लाखांचा मुद्धलेमाल जप्त
आरोपी हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरून तेलंगाणा राज्यात कंटेनर क्रमांक (एचआर 55 एम 7783)ने जनावरे तस्करी करतांना मिळून आले. त्यावरून पोलिसांनी पंचासमक्ष कंटेनरमधून 65 गोवंश अंदाजे 9 लाख 75 हजार, 4 मोबाइल, रोख 1600 तसेच कंटेनर 15 लाख असा एकूण 24 लाख 87 हजार 600 रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. तसेच संबंधित आरोपींविरोधात प्राणीरक्षण सुधारणा अधिनियम 1995च्या कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले करीत आहे.