यवतमाळ - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षामध्ये उपचार घेत असलेल्या 58 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या 8 झाली आहे. हा व्यक्ती मूळचा अकोला येथील असून 14 जूनला तो शहरातील वैद्यकीय महाविद्यालयात भरती झाला होता.
मृत रुग्णाला 5 दिवसांपासून खोकला आणि ताप होता. 15 जूनला त्याला व्हेंटिलेटर लावण्यात आले. काल (मंगळवारी) मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास रुग्णाचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने सांगितले.
यवतमाळ शहरात पुन्हा कोरोनाची एन्ट्री
गत तीन महिन्यांपासून यवतमाळ शहरात असलेला कोरोनाचा उद्रेक पूर्णपणे शांत झाला होता. शहराची कोरोनामुक्तीकडे वाटचाल होत असतानाच आता पुन्हा शहरात कोरोनाची एन्ट्री झाली आहे. नेताजी चौक येथील 45 वर्षीय व्यक्ती औरंगाबाद येथून आला असता त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
या व्यक्तीला दोनतीन दिवसांपासून ताप आणि खोकला होता. तसेच त्याने सुरवातीला खासगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर खासगी रुग्णालयाने त्याला वैद्यकीय महाविद्यालयात पाठविले होते. या व्यक्तीच्या कुटुंबातील 9 सदस्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. कोरोनामुक्त झालेले यवतमाळ शहर पुन्हा एकदा कोरोनाच्या रडारवर आले असून हा व्यक्ती राहत असलेला शहरातील भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येणार आहे