यवतमाळ - आषाढी एकादशीनिमित्त शहरातील प्रति पंढरपूर असलेल्या आणि स्वतंत्र लढ्याचे साक्षीदार असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. जिल्ह्यात चांगला पाऊस पडावा आणि बळीराजाला सुगीचे दिवस यावे, असे साकडे भाविकांनी यावेळी पांडुरंगाला घातले.
जुन्या यवतमाळ शहरातील गांधी चौक भागात पुरातन विठ्ठल मंदिर आहे. मंदिराच्या विश्वस्तांकडून महापूजा केल्यानंतर शहरातून पालखी काढण्यात आली. विठू माऊलीच्या गजराने सर्व परिसर भक्तिमय झाला होता. यावेळी संपूर्ण जिल्ह्यातून दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी रांग लावली होती.
विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे स्वतंत्र पूर्व काळापासून असून या ठिकाणी स्वतंत्र लढ्याच्या बैठकी, आंदोलनाची दिशा या मंदिरात ठरत होत्या. त्यामुळे मोठे महत्व या मंदिराला प्राप्त झाले आहे. मंदिराच्या स्थापनेपासून केवळ धार्मिक महोत्सव या मंदिरात पार पाडत होते. मात्र, गत काही वर्षापासून रुक्मिणी-पांडुरंग संस्थांन सामाजिक क्षेत्रातही योगदान देत आहे. संस्थांच्यावतीने एक गोरक्षण, गरीब, पारधी बेड्यावरील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत, दुष्काळामध्ये जिल्ह्याला मदत अशी विविध सामाजिक उपक्रमही या संस्थेच्यावतीने राबवण्यात येत असल्याचे संस्थानचे विश्वस्त माधव दामले यांनी सांगितले.