यवतमाळ - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून बिगर शेती कर्ज अनेकांनी घेतले होते. मात्र, अनेक वर्षांपासून कर्जाची परतफेड केली नाही. या थकीत कर्जाच्या रकमेचा आकडा 97 कोटींपेक्षा अधिक झाला आहे. त्यामुळे आता संचालक मंडळांने टॉप 150 प्रकरणातील कर्ज वसुलीचे टार्गेट' समोर ठेवले आहे. या वसुलीसाठी बँक आक्रमक झाली असून, अधिकाऱ्यांना सक्तीने वसुली करण्याचे आदेश बँकेचे अध्यक्ष प्रा. टिकाराम कोंगरे यांनी दिले आहेत.
थकबाकीदारांना नोटीस
अनेक थकबाकिदारांनी बॅंकेकडून वाहन, गृह, उद्योग, लघु उद्योग यासाठी कर्ज घेतले होते. मात्र अनेक वर्षानंतर देखील त्यांनी हे कर्ज फेडलेले नाही. अशा दीडशे बड्या थकबाकिदारांना बॅंकेकडून नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत थकबाकिदारांकडून कर्ज वसूल करण्याचा निर्धार बॅंक प्रशासनाने केला आहे.
कर्जाची सक्तीने वसुली
यवतमाळ विभागात 14 प्रकरणे असून, थकीत रक्कम पाच कोटी 16 लाख, दारव्हा 13 प्रकरणात 45 कोटी 55 लाख, पुसद 10 प्रकरणात 38 कोटी 50 लाख, पांढरकवडा 12 प्रकरणात सात कोटी 36 लाख तर वणी विभागात तीन प्रकरणे असून थकीत रक्कम 43 लाख 52 हजार रुपये आहे. वसुलीबाबत कुठलाही भेदभाव होणार नाही. सरसकट वसुली करण्याचा ठराव संचालक मंडळांने घेतला आहे. त्यामुळे कर्जाची वसुली सक्तीने होणार असल्याची माहिती कोंगरे यांनी दिली आहे.
हेही वाचा - वाधवान पिता-पुत्रांचा आणखीन कारनामा उघडकीस; सीबीआयकडून गुन्हा दाखल