यवतमाळ - जिल्ह्यातील पांढरकवडा येथील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक मराठी आणि उर्दू माध्यम शाळेत एकही शिक्षक नाही. त्यामुळे अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यातच बारावीची परीक्षा अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपली आहे. त्यासाठी सर्व विद्यार्थी आणि पालकांनी यवतमाळ जिल्हा परिषदेत धडक दिली.
याच उच्च माध्यमिक शाळेमध्ये विज्ञान शाखेचे विद्यार्थीही शिक्षण घेतात. गेल्या अनेक दिवसांपासून या शाळेमध्ये एकही शिक्षक नाही. काही दिवसांपूर्वी तासिकेवर शिक्षक येत होते. त्यावेळी फक्त रसायनशास्त्र आणि गणिताचे तास होत होते. मात्र, आता तासिकेवर शिक्षकही येत नाही. याबाबत जिल्हा परिषदेकडे वारंवार तक्रार केली. मात्र, त्यांनी सतत दुर्लक्ष केले. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वतः अभ्यास करावा लागत आहे. त्यातच आता बारावीची परीक्षा १ महिन्यावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे परीक्षा द्यायची कशी? असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा आहे.
जवळपास १०० विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांनी जिल्हा परिषदेमध्ये धडक दिली होती. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली असता त्यांनी तासिकेवरील शिक्षकांना आम्ही पैसे देऊ शकत नाही. तुम्ही शासनाकडे मागणी करा, असे सांगितले. तसेच तुमचे निवेदन आम्ही शासनाकडे पोहोचवू असेही ते म्हणाले असल्याची माहिती विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिली. तसेच लवकरात लवकर शिक्षक देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच मागणी पूर्ण न झाल्यास जिल्हा परिषदेच्या आवारात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला.