यवतमाळ- लॉकडाऊन-३ मध्ये ऑरेंज, ग्रीन व रेड झोनमध्ये असलेल्या जिल्ह्यात काही प्रमाणात सेवांमध्ये सूट देण्याबाबतचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले होते. मात्र, जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहून जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी रात्री उशिरा आदेश काढून जिल्ह्यामधील नागरिकांना मिळणाऱ्या सेवा आणि सुविधा या जैसे थेच असणार असल्याचे सांगितले आहे.
आदेशानुसार, अत्यावश्यक सेवा, कृषी, भाजीपाला, दूध या व्यतरिक्त इतर सर्व सेवांना प्रतिबंध लावण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकाने ही ८ ते १२ याच कालावधीत सुरू राहणार आहे. दुकाने सुरू ठेवताना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहे. राज्यात कन्टेनमेंट परिसर सोडून सर्व झोनमध्ये वाईन शॉप उघडणार असल्याचे बोलले जात होते, मात्र जिल्ह्यामध्ये दारू विक्रीबाबत परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे, तळीरामांचा हिरमोड झाला आहे. दरम्यान, शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही ८१ इतकी झालेली आहे. त्यामुळे, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा आदेश काढण्यात आला आहे.
हेही वाचा- यवतमाळमध्ये कोरोनाबाधितांची एकूण संख्या 81