यवतमाळ - शहराला पाणी पुरवठा करणारे निळोणा धरण ओव्हरफ्लो झाले असून जिल्ह्यातील इतर लघु प्रकल्पांच्या जलसाठ्यातही वाढ झाली आहे. जिल्ह्याच्या विविध भागात गेल्या आठवड्यापासून मध्यम ते मुसळधार स्वरूपचा पाऊस पडत आहे. मागील दोन दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. या पावसामुळे निळोणा धरण भरले असून यवतमाळकरांना येत्या उन्हाळ्यासाठी दिलासा मिळाला आहे.
यावर्षी जिल्ह्यात जून महिन्याच्या सुरुवातीला समाधानकारक पावसाने हजेरी लावली होती. यानंतर काही काळ पावसात खंड पडला. मात्र, पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने नदी, नाल्यांना पूर आले आहेत. सोमवारी रात्रीपासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून दोन दिवसात 25 आणि 21.4 मिलीमिटर पावसाची नोंद करण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यातील पावसाची वार्षिक सरासरी 926.80 मिलीमीटर असून आत्तापर्यंत 317 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे.