यवतमाळ : जिल्ह्यात सुरुवातीला एकेरी अंकात वाढणारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या गत काही दिवसांपासून रोज दुहेरी अंकात वाढत आहे. सोमवारी जिल्ह्यात तब्बल 68 पॉझिटिव्ह रुग्णांची नव्याने नोंद झाल्याने चिंतेत भर पडली आहे. तर आयसोलेशन वॉर्ड आणि विविध कोविड केअर सेंटरमध्ये भरती असलेले सहाजण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
सोमवारी नव्याने पॉझिटिव्ह आढळून आलेल्या 68 जणांमध्ये 40 पुरुष व 28 महिलांचा समावेश आहे. यात पांढरकवडा येथील 24 पुरुष व 18 महिला, यवतमाळ शहरातील संजय गांधी नगर भोसा रोड येथील एक महिला, यवतमाळ शहरातील रोहिदास नगर येथील एक पुरुष तसेच यवतमाळातील तीन पुरुष व दोन महिला, पुसद शहरातील चार पुरुष व तीन महिला, नेर शहरातील नवीन नगरी येथील दोन पुरुष व एक महिला, दिग्रस शहरातील तीन पुरुष, कळंब तालुक्यातील जोडमोहा येथील एक महिला, उमरखेड शहरातील एक पुरुष व एक महिला, महागाव येथील एक पुरुष, आर्णि शहरातील ग्रीन पार्क येथील एक पुरुष व आर्णि येथील एका महिलेचा समावेश आहे.
जिल्ह्यात रविवारपर्यंत ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 238 होती. यात आज तब्बल 68 नवीन रुग्णांची भर पडल्याने हा आकडा 306 वर पोहोचला. मात्र, 'पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह' झालेल्या सहा जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्याने सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 300 आहे. यात विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतील चाचणीद्वारे 268 तर रॅपीड ॲन्टीजेन टेस्टद्वारे पॉझिटिव्ह आलेले 32 जण आहेत. जिल्ह्यात सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 812 झाली आहे. यापैकी 486 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर, जिल्ह्यात 26 मृत्यूची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 64 जण भरती आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरुवातीपासून आतापर्यंत 13,407 नमुने पाठविले असून यापैकी 12,078 प्राप्त तर 1,320 अप्राप्त आहेत. तसेच 11,266 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आले आहेत.