यवतमाळ - कोरोना संसर्गामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दररोज वाढणाऱ्या रूग्णांमुळे शासकीय व खासगी रूग्णालयांमध्ये रूग्णांना बेड मिळणेही कठीण आहे. यावर तोडगा काढून रूग्णांना वेळेत खाटा मिळून उपचार व्हावेत, यासाठी यवतमाळ येथे नव्यानेच निर्माण केलेल्या जिल्हा स्त्री रूग्णालयात अद्यायावत कोविड हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. लवकरच हे हॉस्पिटल सुरू होणार असल्याने संकटकाळात रूग्णांना मदत मिळेल.
लवकरच पालकमंत्र्याच्याहस्ते उद्घाटन -
यवतमाळात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि त्यानंतर जिल्हा स्त्री रूग्णालयाची पायाभरणी झाली होती. त्यातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल गेल्या एक वर्षांपासून कोरोना रूग्णांच्या सेवेत आहेत. तर स्त्री रूग्णालयातील कोविड हॉस्पिटलही लवकरच सुरू होत असल्याने वैद्यकीय सेवेवरील ताण कमी होऊन रूग्णांनाही दिलासा मिळणार आहे. आमदार संजय राठोड यांनी जिल्हा स्त्री रूग्णालयाचे काम पूर्णत्त्वास नेण्यासाठी कमी पडणारा १७ कोटींचा निधी शासनाकडून मंजूर करवून घेतला आहे. लवकरच या कोविड हॉस्पिटलचे पालकमंत्री सांदीपान भुमरे यांच्याहस्ते लोकार्पण होणार आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांची खाटा किंवा उपचाराअभावी होणारी परवड थांबणार असून नवीन जिल्हा स्त्री रूग्णालयातील कोविड सेंटरद्वारे रूग्णांना नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
180 खाटांचे हॉस्पिटलमध्ये नियोजन -
या कोविड हॉस्पिटल सध्या १०० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात ५० ऑक्सिजन बेड तर ५० साधारण बेड राहणार आहेत. शिवाय व्हेंटिलेटरचीही व्यवस्था येथे करण्यात येत आहे. टप्प्याटप्प्याने सर्व वॉड तयार करण्यात येत आहे. एकूण १८० बेडची व्यवस्था या दवाखान्यात होणार आहे.