यवतमाळ - उमेदवारी अर्ज जाहीर करण्याच्या आधीपर्यंत राजकीय घडामोडी सुरू राहणार आहेत. आज ज्यांना पक्षात घेत आहेत, त्यांना ते उमेदवारी देऊ शकणार का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवारांनी उपस्थित केला. उमेदवार अर्ज दाखल करेपर्यंत कोण कुठल्या पक्षात राहिल हे सांगता येणं कठीण असल्याचेही पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
काही लोक आपल्या स्वार्थासाठी पक्षांतर करतात. काहीजण आपल्या मागे चौकशीचा ससेमिरा लागू नये म्हणून जात असतात. काही जण स्वत:ची संस्था अडचणीत असल्याने त्या चालवण्यासाठी वरदहस्त हवा असतो, म्हणून जातात. तर काही जण उद्या काय होणार याबाबत स्वार्थी विचार करून पक्षांतर करतात. कुठल्याही पक्षात प्रत्येकाला जाण्याचा अधिकार आहे. यातून काही लोक गेले. काही नवे लोक पक्ष्यात वजाबाकी होत असते. काही अफवाही असतात. कुणाकडून जाणीव पूर्वक बातम्या पसरवल्या जातात. उमेदवारी अर्ज जाहीर करण्याच्या आधीपर्यंत राजकीय घडामोडी सुरू राहणार आहेत.
राज्यात युती झाल्यास २८८ जागांवर भाजप १२२ आणि सेनेचे ६२ उमेदवार उभे राहणार आहेत. मग शिल्लक जागा मित्र पक्षांना मिळणार आहेत. याचा विचार केला तर पक्षांतर केलेल्यांना उमेदवारी दिल्यास पक्षातील निष्ठावंत उमेदवार नाराज होतील, आणि ते वेगळा विचार करतील.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून आम्हाला तिकीट द्यायचे आहे अशेच उमेदवार आम्ही पाहात आहोत. वंचित आघाडीने काँग्रेसला 40 जागा देऊ केल्या होत्या. आता ते 144 वर गेले आहेत. अजून बदल होतोय, अजून काही दिवस जायचे आहेत. राजकीय घडामोडी व्हायच्या आहेत, असेही अजित पवार म्हणाले.