यवतमाळ - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आले आहे. या काळात सर्व उद्योग धंदे आणि व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे मजूर वर्गाची उपासमार होत आहे. यवतमाळमधील अशा गरजू मजूरांना नाम फाउंडेशनने मदतीचा हात दिला आहे.
नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या नाम फाउंडेशनने आजपर्यंत अनेकांना मदतीचा हात दिला आहे. हीच भावना मनात ठेवून कोरोनामुळे आलेल्या संकटावर मात करण्यासाठी यवतमाळकरांना किराणा साहित्याचे वाटप फाउंडेशनच्यावतीने करण्यात आले. ही मदत यवतमाळ जिल्ह्यातील वणी, नेर, पुसद, उमरखेड, झरी, यवतमाळ या तालुक्यात देण्यात आली. नामचे विदर्भ-खान्देश प्रमुख हरीष इथापे यांच्या मार्गदर्शनात आणि जिल्हा समन्वयक नितिन पवार यांच्या पुढाकाराने ही मदत पोहचवण्यात येत आहे.
मध्यमवर्गीय कुटुंबाला गरज असूनही ते कुणाला मदत मागू शकत नाही, अशी सध्या परिस्थिती आहे. अशा घटकांना ही मदत देण्यात येत आहे. हातावर पोट असलेले कलाकार, ऑटो चालवणारे चालक, कंत्राटी कर्मचारी यांच्या घरी मदत पोहचवण्यात आली. या उपक्रमाचा प्रारंभ यवतमाळ येथून करण्यात आला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बावीस्कर, डॉ. अनिल पटेल, महेश पवार संयोजक स्वामिनी यांच्या हस्ते किरणा किटचे वाटप करण्यात आले.