यवतमाळ - कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची परिस्थिती आणि मृतांच्या घटना पाहून मन हेलावून जात असल्याची भावना जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केल्या आहेत. नेर तालुक्यात एकाच घरातील तीन भाऊ कोरोनामुळे दगावल्याची घटना नुकतीच घडली. तसेच कोव्हिड वॉर्डात व्हेंटिलेटरवर अवघ्या 17 वर्षाच्या मुलाला पाहिल्याने मन विचलीत झाले. त्यामुळे नागरिकांनी कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी जबाबदारीने वागावे, असे आवाहनही राठोड यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे. नेर तालुक्यातील उत्तर वाढोणा येथे ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ या मोहिमेचा शुभारंभ करताना ते बोलत होते.
कोरोनाला हरवायचे असेल तर प्रत्येकाने जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. शासन, प्रशासन, आरोग्य विभाग गत सहा महिन्यांपासून नागरिकांच्या आरोग्यासाठी झटत असून वारंवार आवाहन करीत आहे. तरीसुध्दा नागरिक त्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. भविष्यात जर आपण असेच बेजबाबदारपणे वागत राहिलो तर यापेक्षा आणखी गंभीर परिस्थती निर्माण होईल. आताच शहरात बेड मिळणे कठीण झाले आहे. शासन आणि प्रशासन आपल्यासाठी कटिबध्द तर आहेच. मात्र आता आपली जबाबदारीसुध्दा वाढली आहे. याच संकल्पनेतून राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ ही मोहीम सुरू केली आहे.
कोरोनाबाबत आजही ग्रामीण भागात बरेच गैरसमज आहेत. प्रशासनाला दीड लाख रुपये मिळतात, म्हणून पॉझेटिव्ह दाखविणे सुरू आहे, असा अपप्रचार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र यावर कोणीही विश्वास ठेवू नये. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग अतिशय जोखीम उचलून नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर आहे. त्यांना सहकार्य करा. हात स्वच्छ धुणे, मास्क वापरणे आणि सामाजिक अंतराचे पालन करणे, ऐवढ्या साध्या सुचनांची प्रत्येकाने काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत घरी तपासणीसाठी येणा-या चमुला सहकार्य करा. त्यांना योग्य माहिती द्या व ही मोहीम यशस्वी करा, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.