यवतमाळ - गावाचा विकास करायचा असेल तर शिक्षित युवक, युवतींनी निवडणुकीच्या रिंगणात उतरले पाहिजे. हे पाऊल गावाचा कायापालट करू शकतं. आजपर्यंत केवळ प्रस्थापितांनी गावातील राजकारणात वर्चस्व प्रस्थापित करून राजकारण केले. मात्र विकास झाला नाही. आणि त्यामुळेच यावर्षीच्या निवडणुकीमध्ये मोठ्या संख्येने युवक निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
अशीच एक बेलोरा या गावातील अश्विनी राऊत कला शाखेची विद्यार्थीनी असून दोन महिन्यांची बाळंतीण आहे. तिने अण्णा हजारे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन निवडणुकीच्या रिंगणात सहभाग घेतला आहे. यावर्षी संधी मिळाली नाही, तर पुन्हा पाच वर्ष थांबावे लागेल, आणि आणि गावाचा विकास थांबेल, हाच उद्देश अश्विनीने डोळ्यासमोर ठेवला आहे.
![बेलोरा ग्रामपंचायत निवडणूक](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-ytl-01-grampanchyat-nivdnuk-ashwani-raut-byte-vis-7204456_30122020095827_3012f_00373_242.jpg)
महिलांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचे ध्येय
शासनाच्या विविध योजना असतात. महिलांची आर्थिक उन्नती व्हावी, यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करते. मात्र, या योजनांचा लाभ गावातील महिलांना मिळू शकत नाही. त्यामुळे त्यांची प्रगती खुंटली आहे. तसेच अनेक योजना असून देखील गावात त्या राबवल्या जात नाही. आणि म्हणूनच गावाचा विकास व्हावा, गाव समृद्ध व्हावे, आदर्श गाव निर्माण व्हावे यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याची प्रतिक्रिया अश्विनीने दिली आहे.
![बेलोरा ग्रामपंचायत निवडणूक](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-ytl-01-grampanchyat-nivdnuk-ashwani-raut-byte-vis-7204456_30122020095827_3012f_00373_731.jpg)