यवतमाळ - दिग्रस तालुक्यातील आरंभी येथील माय-लेकी शेतामध्ये निंदन्यासाठी गेल्या होत्या. यावेळी जोराचा पाऊस झाल्याने घरी परतताना मायलेकी पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे. आरंभी-चिरकूटा मार्गावरील नाल्यातील पाण्यात वाढ झाली होती. या पूलावरून जाताना अचानक पाण्याचा वेग वाढल्याने दोघी वाहून गेल्या आहेत.
कविता किशोर राठोड (वय -35) व मुलगी निमा किशोर राठोड (वय -15) असे पुरात वाहून गेलेल्या माय-लेकीचे नाव आहे. या घटनेची माहिती आरंभीच्या ग्रामस्थांना मिळताच त्यांनी दोघींची शोध घेण्यास सुरुवात केली.
दिग्रस तहसील कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती विभागाला पाचारण करण्यात आले. त्यांनीही दोघींची शोधाशोध केली. मात्र रात्री उशिरापर्यंत या मायलेकींचा शोध लागला नव्हता. आज सकाळच्या सुमारास आरंभी ते सावरगाव (खुर्द) या दोन गावांमधून जाणाऱ्या नाल्या शेजारी असलेल्या भुजाडे नामक शेतकऱ्याच्या शेतात मुलीचा तर जाधव यांच्या शेताशेजारी आईचा मृतदेह आढळून आला.
दिग्रसचे तहसीलदार राजेश वझीरे यांच्यासह नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी, तलाठी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी दिग्रसला पाठवले आहेत.