यवतमाळ - खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पेरलेले महाबीजचे सोयाबीन बियाणे मोठ्या प्रमाणात नकली निघाले आहे. त्यामुळे खरीप हंगाम पूर्णपणे वाया जाणार आहे. दुबार पेरणीसाठी खर्च जास्त होणार असे चित्र जिल्ह्यात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.
खरीप हंगामाच्या सुरुवातीला 115 मिली मीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली तरी, त्यांच्यावर संकट ओढावले आहे. महाबीज कंपनीच्या बियाण्यावर शेतकऱ्यांचा विश्वास आहे. हमखास उगवणारे बियाणे म्हणून ओळखले जाते. या हंगामात महाबीज कंपनीच्या बियाण्याने घात केला आहे. केवळ दहा टक्के बियाणे उगवले आहे. अजूनही बोगस बियाणे महाबीज कार्यालयात पडून आहे. त्या बियाण्याला सील ठोकण्याची मागणी करण्यात आली आहे.
हंगाम कोणताही आला तरी शेतकऱ्यांना साथ देत नाही. निसर्गाच्या भरोशावर पेरणी केली. कृषी विभागाचे म्हणणे देखील मानले. परंतु, समाधानकारक पाऊस पडून देखील बियाणे उगवले नाही, ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे, असा आरोप करण्यात येत आहे. जिल्ह्यातील 743 शेतकऱ्यांनी महाबीज बियाणे न उगवल्याच्या तक्रारी केल्या आहेत. यातील केवळ 261 शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन कृषी विभागाने पंचनामे केले आहे.
उर्वरीत 500 पेक्षा जास्त शेतकऱ्यांचे पंचनामे करायला किमान जुलै पंधरवाडा जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करायची की नाही, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. पंचनामे झाले नाही तर महाबीजकडून भरपाई मिळणार नाही आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल. या कालावधीत दुपारी पेरणीचीही वेळ निघून जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
बोगस बियाण्यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांचे पुरते कंबरडे मोडले आहे. दुबार पेरणीसाठी आता अनेक शेतकऱ्यांकडे पैसा उरला नाही. मग आता कारायचे तरी काय, असा प्रश्न निर्माण
झाला आहे.