यवतमाळ - वणी ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर करण्यात यावे, असा आदेश 2013 रोजी शासनाकडून देण्यात आला. मात्र ,अद्यापही उपजिल्हा रुग्णालय कार्यान्वित झाले नाही. या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी आपल्या सहकार्यांसह तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. या उपोषणाला अनेक सामाजिक संघटनांचा पाठिंबा दिला आहे.
उपजिल्हा रुग्णालयाची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. राज्यातील 34 ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर करण्यात यावे, असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता. यासाठी 2001 च्या लोकसंख्येवर आधारित आरोग्य संस्था स्थापनेचा बृहत आराखडा तयार करण्यात आला. अस्तित्वात असलेल्या 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. पण, वणीतील ग्रामीण रुग्णालयात अद्याप कुठलीच अंमलबजावणी करण्यात आली नाही. वनी तालुक्यात कोरोनाचे दिवसागणिक रुग्ण वाढत आहेत. शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये रुग्णांना सोयीसुविधांचा अभाव असल्याची ओरडही होत आहे. ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन झाले असते तर कोरोना बाधित रुग्णांना उपचारासाठी वणवण भटकावे लागणार नाही. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात ची सुविधा लागू करून कोविड सेंटर सुरू करावे, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
हेही वाचा - विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंकडून सानिकाच्या शिक्षणाची जबाबदारी; थेट घरी येऊन केली मदत