यवतमाळ - कोविड पश्चात होणाऱ्या म्यूकरमायकोसिस आजाराने सध्या डोके वर काढले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही या आजाराने ग्रासलेले काही रूग्ण दाखल आहेत. या रूग्णांची थेट वॉर्डात जाऊन विचारपूस करून आमदार संजय राठोड यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज पाच तास घालविले. यावेळी त्यांनी म्यूकरमायकोसिस वॉर्डासह, बालकांसाठी तयार करण्यात येत असलेल्या कोविड उपचार वॉर्डाची देखील पाहणी केली. या भेटीत आमदार राठोड यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील कोविड संसर्गाच्या सद्यस्थितीची माहिती घेऊन म्यूकरमायकोसिसग्रस्तांना औषधींचा तुटवडा पडायला नको, अश्या सूचना दिल्या.
रूग्णांची घेतली भेट -
सध्या जिल्ह्यात कोविड पश्चात होणारा बुरशीजन्य म्यूकरमायकोसिस आजार फोफावला आहे. काळी बुरशी व आता पांढरी बुरशी या आजाराने कोविड होऊन गेलेले रूग्ण बेजार झाले आहेत. या रूग्णांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात काय व्यवस्था आहे, त्यांच्यावर उपचारासाठी औषधांचा पुरेसा साठा आहे की नाही, आदी बाबत माहिती घेण्यासाठी संजय राठोड हे आज वैद्यकीय महाविद्यालयात पोहोचले. यावेळी त्यांनी म्यूकरमायकोसिस आजार झालेल्या रूग्णांची प्रत्यक्ष भेट घेऊन विचारपूस करीत त्यांना दिलासा दिला. या रूग्णांवर शस्त्रक्रियेची गरज असल्यास त्याबाबत तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या. तसेच या आजारासंबधी लागणाऱ्या औषधींचा तुटवटा पडायला नको, त्यामुळे या औषधी तातडीने मागवून स्टॉकमध्ये ठेवण्याच्या सूचना केल्या.
वार्डाची केली पाहणी -
बालकांसाठी सुरू करण्यात येत असलेल्या बाल कोविड उपचार वॉर्डासह महिलांसाठी तयार करण्यात आलेला अतिरिक्त उपचार कक्ष, हेवतून ऑक्सिजन घेणारा प्लांट, लिक्वीड ऑक्सिजन प्लांट याचीही पाहणी केली. त्यांनतर महाविद्यालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून जिल्ह्यातील कोविड स्थिती, उपलब्ध खाटा, ऑक्सिजनची सद्यस्थिती जाणून घेतली.
हेही वाचा - धक्कादायक : अवघ्या १३ तासात आई, वडील आणि मुलाचा कोरोनाने मृत्यू