यवतमाळ - थकीत हप्त्याच्या मोबदल्यात शेतकरी महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा संतापजनक प्रकार घाटजी तालुक्यात समोर आला आहे. या प्रकरणी पीडित महिलेने पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे. शरीर सुखास नकार दिल्याने संबंधित वसुलीदाराने आपल्यावर अतिप्रसंग केल्याचाही आरोप पीडितेने तक्रारीमध्ये केला आहे. घाटंजी तालुक्यातील लहान मोवाडा गावात ही घटना घडली आहे.
सुरेश गजभिये (रा. यवतमाळ) ,असे आरोपीचे नाव आहे. पीडित महिलेचा पती मानसिक रुग्ण असल्याने ती स्वत:च संपूर्ण व्यवहार करते. शेतीकामासाठी बँकेकडून वर्षापूर्वी कर्ज काढत ट्रॅक्टर घेतला होता. त्या कर्जाचे दोन हप्ते देखील भरले होते. थकीत हप्त्यासाठी बँकेतून काहीजण वसुलीसाठी आले होते. त्यावेळी घरामध्ये विचारणा केली असता, घरात पीडितेचा मुलगा, मुलगी आणि बहीण उपस्थित होते. त्यामुळे मुलाने पैशाचे सर्व व्यवहार आई बघते म्हणत आईशी बोलणी कऱण्यासाठी आई काम करत असल्याल्या शेतात घेऊन गेला. त्यावेळी वसुलीदाराने महिलेला घरी चला कर्जाबाबात बोलायचे आहे, असे सांगितले. दरम्यान, सुरेश सोबत आलेल्या अन्य व्यक्तींनी त्यांचा थकबाकीपोटी ट्रॅक्टर घेऊन गेले असल्याचे पीडितेच्या मुलीने पीडितेला घरात सांगितले.
याबाबत महिलेने संशयिताला विचारणा केली. त्यानंतर सुरेशने जातिवाचक शिवीगाळ करून मी हप्ते भरतो म्हणत शरीरसुखाची मागणी केल्याची तक्रार पोलिसात केली आहे. महिलेने आरडाओरड केल्याने सुरेशने पळ काढला. पीडिता तक्रार देण्यासाठी घाटंजी पोलीस ठाण्यात गेली. त्या ठिकाणी त्यांना दीड तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवल्यानंतर तक्रार घेण्यास नकार दिला. त्यामुळे पीडित महिलेने पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. त्यानंतर घाटंजी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी व तक्रार घेण्यास नकार देणाऱ्या पोलिसांवर कारवाई व्हावी, अशी पीडितेची मागणी आहे.
हेही वाचा - बोगस खतांची विक्री करणाऱ्यांवर तत्काळ कारवाईचे विधानसभा अध्यक्षांचे आदेश