यवतमाळ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा सोमवारी (५ ऑगस्ट) यवतमाळ जिल्ह्यात पोहोचणार आहे. यावेळी मुख्यमंत्री राळेगाव, यवतमाळ आणि दारव्हा या 3 मतदारसंघात जाहीर सभा घेणार आहेत. या यात्रेच्या निमित्ताने भाजपकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांची सोमवारी (५ ऑगस्ट) दुपारी साडेचार वाजता राळेगाव तर सायंकाळी ७ वाजता यवतमाळ येथील पोस्टल ग्राउंड वरती जाहीर सभा पार पडणार आहे. मंगळवारी सकाळी मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद होणार आहे. तर सकाळी ११ वाजता दारव्हा मतदारसंघात जाहीर सभा होणार आहे, अशी माहितीती पालकमंत्री मदन येरावर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, आमदार निलय नाईक, आमदार संजीयरेड्डी बोथकुरवार अमोल ढोणे आणि नितीन गिरी उपस्थित होते.
सोमवारी चंद्रपूर जिल्ह्यातून यवतमाळमध्ये ही यात्रा येणार आहे. यावेळी वनी मतदारसंघातील कोसारा, राळेगाव मतदार संघातील खैरी मार्गे राळेगाव येथील न्यू इंग्लिश हायस्कूलच्या पटांगणामध्ये ही यात्रा येणार आहे. त्यानंतर दुपारी साडेचार वाजता याठिकाणी जाहीर सभा पार पडणार आहे. तर सायंकाळी ७ वाजता यवतमाळ येथील पोस्टल ग्राउंड वरती दुसरी सभा होणार आहे. या दिवशी मुख्यमंत्री यवतमाळ येथे मुक्काम करणार आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता पत्रकार परिषद आटोपून दारव्हा मतदारसंघात दुपारी ११ वाजता जाहीर सभेला जाणार आहेत. यानंतर ही जनादेश यात्रा अकोला जिल्ह्यात प्रस्थान करणार आहेत.
या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रातील जनतेसमोर जाऊन मागील ५ वर्षात केलेल्या कामांचा आढावा सांगण्यात येणार आहेत. शासनाने राबविलेल्या योजनांचा माहितीही या यात्रेतून जनतेला देण्यात येणार आहे.