यवतमाळ- वनविभागाने धडक कारवाई करीत उत्तरवाढोणा येथील एका व्यक्तीच्या घरातून बिबट्याची कातडी आणि चिंकाराचे शिंग हस्तगत केले आहे. वनक्षेत्रात वन्यप्राण्यांची शिकार होत असल्याचे या कारवाईने अधोरेखीत झाले आहे. राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्या मतदारसंघातच वन्यजीवांच्या शिकारीचे प्रकरण उघडकीस आल्याने वनवर्तुळात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा- केंद्राने 'आयएफसी' स्थलांतरित करण्याचा निर्णय मागे घ्यावा - अरविंद सावंत
उपवनसंरक्षक डॉ. भानुदास पिंगळे यांच्या मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक दारव्हा आणि नेरचे वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद कोहळे यांच्या नेतृत्वातील पथकाने उत्तरवाढोणा येथील गजानन कुनगर याच्या घरी छापा मारला. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सुमारे 50 जणांच्या पथकाने मारलेल्या या धाडीत घरातून बिबट्याचे कातडे व एका चिंकाऱ्याचे शिंग आढळून आले. वन्यजीवांचे हे अवयव जप्त करण्यात आले आहे.
नेर-अमरावती रोडवरील उत्तरवाढोणा येथे झालेल्या या धडक कारवाईने गावातही खळबळ उडाली. गजानन कुनगर यांच्या घरी या पथकाने झडती घेतली तेव्हा घराच्या वरच्या माळ्यावर वन्यजीवांचे हे अवशेष आढळले. कुनगर याने आपण शिकार केली नाही व हे अवयव कुणी आणून टाकले हे आपल्याला माहीत नाही अशी भूमिका घेतली. मात्र, तरी वनविभागाने आरोपीला अटक केली आहे. दरम्यान पोलिसांच्या श्वान पथकाने आरोपीच्या घरी पाहणी केल्यानंतर श्वान परिसरात काही दूर टेहळले. ही शिकार कधी व कोठे झाली याबाबत वनविभाग तपासणी करीत आहे. कुनगर यांचा वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्या कुण्या टोळीशी तर संपर्क नाही ना? आदी मुद्यांवर वन विभागाचे अधिकारी चौकशी करीत आहेत.
कुनगर यांच्या घराच्या अवतीभोवतीचा परिसरही वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पिंजून काढला. वन्यप्राण्यांची शिकार झाल्याची गोपनीय माहिती वनविभागाला मिळाली होती त्यानंतर ही धडक कारवाई करण्यात आली.