यवतमाळ - जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या झरी तालुक्यातील कोसारा ते मारेगाव या रस्त्यावर खूप मोठाले खड्डे पडले आहेत. हा रस्ता ये-जा करणाऱ्या नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. रस्त्यावर एखाद्याचा अपघात होईल, तेव्हाच बांधकाम विभागाचे डोळे उघडेल का? असा प्रश्न ग्रामस्थ करीत आहेत.
आमदार संजीवरेड्डी बोथकुरवार, खासदार बाळू धानोरकर, जिल्हा परिषद सदस्य व इतर लोकप्रतिनिधी आपल्या आलिशान वाहनातून फिरतात. त्यामुळे, त्यांना त्रास काय, हे माहीत नाही. मात्र, नागरिकांना या रस्त्यावरून जाताना मोठा त्रास सहन करावा लागतो. जनतेचा त्रास त्यांना कळत नाही. रस्त्याच्या दुरुस्तीबाबत तक्रार केल्यास नेत्यांकडून टोलवाटोलवीची उत्तरे दिली जातात. केवळ मते मागण्यासाठीच हे लोकप्रतिनिधी आहेत का? असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
ग्रामस्थांच्या सूचनेला केराची टोपली
कोसरा ते मारेगाव हा रस्ता अत्यंत खड्डेमय झाला असून या रस्त्यावर अपघातसुद्धा झाले आहेत. पण, सुदैवाने जीवित हानी झाली नाही. रस्त्यावरून वाहन चालवणे तर सोडा, साधे पाई चालनेसुद्धा कठीण झाले आहे. रस्त्यावरील पुलावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. १९९४ साली पूल बांधल्यानंतर प्रशासनाने व शासनाने रस्त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. गावातील नागरिकांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला वारंवार सूचना करूनसुद्धा या समस्येकडे पूर्णतः दुर्लक्ष केले जात आहे.
रस्त्यावर अपघात होऊन मनुष्य हानी झाल्यावरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत. शासनाने कोसारा ते मारेगाव या मुख्य रस्त्याकडे त्वरित लक्ष देऊन पुलाची व रस्त्याची डागडुजी करावी, अशी मागणी कोसारा, डोंगरगाव येथील नागरिकांनी केली आहे. अन्यथा आंदोलन छेडू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
हेही वाचा- 'शेतकऱ्यांचा पैसा विमा कंपन्यांना लुटू देणार नाही'